Thursday, September 13, 2018

कौस्तुभ राणे सांगून गेले..

कौस्तुभ राणे सांगून गेले...

आज दि. ९ ऑगस्ट २०१८

दोन दिवस झाले. हुतात्मा कौस्तुभ राणेंचा विषय काहीकेल्या डोक्यातून जात नव्हता. त्यांच्या तुलनेत म्हणा, किंवा त्यांच्या समोर म्हणा.. 'आपण किती कफल्लक आणि किती कद्रु आहोत', असं वाटत होतं सतत.. 
हा माणूस 'माझ्यासाठी' छातीवर गोळी झेलत होता, हे तर कितीक वेळा आठवत होतं. आज ऑफिसकडे येत असताना पुन्हा तोच विषय.. का कुणास ठाऊक..? 
ऑफिसखाली पोहोचलो.. व्हॉट्स अॅपवर कौस्तुभ राणेंची अत्यंयात्रा पाहिली आणि भरून आलं.. भर रस्त्यावर कितीतरी दिवसांनी असा रडलो असेन.. पण, सहनच होत नव्हतं.. 
ऑफिसमध्ये जागेवर जाऊन बसता बसता जे जे मनात आलं ते लिहून काढलं...

कौस्तुभ राणे जाता जाता
सांगून गेले हेच अखेरी,
आम्ही मरतो देशासाठी
थोडे तुम्ही जगा तरी...
धर्मच नसतो घुसखोरांना,
जात-पात ना गोळीला
ती येते, ती घुसते, भिडते,
भारत भू च्या रक्ताला
थोपवतो तो हल्ला आम्ही,
वार घेऊन याच उरी
आम्ही मरतो देशासाठी, 
थोडे तुम्ही जगा तरी...

रोज चकवतो मृत्यूला मी,
रोज यमाशी गप्पागोष्टी
किती पाठवू आज-उद्या ते,
रोज ठरवतो भेटाभेटी,
येऊ न देतो समोर तुमच्या,
ना यम, ना तो अतिरेकी,
आम्ही मरतो देशासाठी,
थोडे तुम्ही जगा तरी...
ना झिजलो मी वार्धक्याने,
ना थिजलो मी आजारी
रसरसते तारुण्य वेचुनी,
इथल्या माती रुजलो मी,
त्या वेलीवर फुलून यावी,
पराक्रमाची फुलवारी
आम्ही मरतो देशासाठी,
थोडे तुम्ही जगा तरी...

नकोत अश्रू नको सांत्वना,
आम्हास मृत्यू ना मारी
दिगंत राहू, चिरंजीव हो,
हवा फक्त निर्धार उरी,
भारत भू चा हक्कच आहे,
आमच्या श्वासा वरी जरी
आम्ही मरतो देशासाठी,
थोडे तुम्ही जगा तरी...
भल्याबुऱ्याचे मंथन घडते,
त्यातून 'कौस्तुभ' उजळावे
आपण कुठल्या बाजूला ते,
मनोमनी हे ठरवावे,
असे रत्न कधी फुका न जावे,
घ्या हो निर्णय आता तरी
आम्ही मरतो देशासाठी,
थोडे तुम्ही जगा तरी...

सोडवली रक्ताची नाती,
थेंब थेंब कर्तव्यासाठी
'सखी' नी माझे 'पिलू कोवळे',

दुरावले मी देशासाठी,
अभिमानाने फुलून जाईल,
आयुष्य त्यांचे खरे जरी
आम्ही मरतो देशासाठी,
थोडे तुम्ही जगा तरी...
ना नाते ना गोत्यासाठी,
मी न चाललो स्वार्थासाठी
मोठा असतो देश नेहमी,
समजून घ्या हे सर्वांसाठी
स्मशानअग्नी मनी चेतवा,
या त्यागाची ललकारी
आम्ही मरतो देशासाठी,
थोडे तुम्ही जगा तरी...

नील, पुणे
(स्वप्नील बापट)

दि. ९ ऑगस्ट २०१८

Tuesday, February 9, 2010

मी निरुत्तर....

लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती. एक छोटी मुलगी विहीरीत पडते. तिला वाचवायला एकजण उडी मारतो. तिला वाचवतो. बाहेर आल्यावर लोक त्याचं कौतुक करतात. पण तो विचारतो, कौतुक वगैरे ठीक आहे, पण मला ढकललं कुणी?

बातमीदारी करताना बऱ्याचदा अशा प्रसंगांना आणि प्रश्‍नांना सामोरं जावं लागतं. लक्षात येतं की सगळंच काही वाईट नसतं. आपणच फक्त बरोबर असतो असं नाही. बातमीदारीत प्रत्येक शब्दाला महत्व असतं. पण तेच शब्द चुकीच्या ठिकाणी वापरले किंवा गरज नसताना वापरले तर गोंधळ उडतात.

"पद्म पुरस्कारावरनं सुरू झालेल्या वादात पाडगावकर यांची उडी' अशा आशयाच्या बातम्या वाचल्या आणि ही गोष्ट आठवली. पद्म पुरस्कार जाहीर झाले. ते कुणाला मिळाले? कसे मिळाले? हा वादाचा विषय झाला. पण या विषयाशी दूरान्वयेही संबंध नसलेल्या काहींना हे प्रश्‍न कॅमेऱ्यासमोर विचारले जातात. उत्तर दिलं नाही तर "या विषयावर बोलायला नकार' आणि उत्तर दिलंच तर "अमुक अमुक वादात यांचीही उडी' अशा मथळ्याच्या बातम्या. अरे त्यांनी उडी घेतलेली नाही. तर त्यांना त्या वादात ओढलं गेलंय, हे लक्षात घेतलं जात नाही.

बरं राजकारणात तर अनेकजण असे असतात जे केंद्रीय अर्थसंकल्पापास्नं गावातल्या गटारीपर्यंत कुठल्याही विषयावर अधिकारवाणीनं बोलतात. त्या मंडळींना तर अशा वादात ढकलावंच लागत नाही. ते आपणहून उडी घेतात. पण सगळेच तसे नसतात. काहीवेळा बातमीदारी करताना, प्रतिक्रिया घेण्यासाठी व्यक्तींची निवड करतानाच गल्लत होते, अशी जी टीका होते, त्याचं हे उत्तम उदाहरण. एखाद्या विषयावरचा तज्ज्ञ कोण? हे समजून त्यालाच त्या विषयावर प्रश्‍न विचारला गेला पाहिजे. पण टीआरपीसाठी वाट्टेल ते होतं, असं लोकं म्हणतात ते काही खोटं नाही.

पाडगावकरांना हा प्रश्‍न विचारलाच का? असा प्रश्‍न मला एका काकांनी विचारला. "मी निरुत्तर'. कदाचित माझा बातमीदारीतला अनुभव कमी असेल, पण त्या काकांना देण्यासाठी या प्रश्‍नाचं उत्तर मला सापडलं नाही. पद्म पुरस्कार कुणाला मिळावा? आणि कुणाला मिळाला नाही?, हा प्रश्‍न पाडगावकरांना का विचारावा? ते निवड समितीवर आहेत? की स्पर्धेत होते आणि त्यांची निवड झालेली नाही? की आणखी काही? जर या प्रश्‍नांची उत्तरं नसतील तर उगाचच त्यांच्यापुढे कॅमेरा किंवा वहीपेन घेण्यात काय अर्थ?

बरं, "मला पद्म पुरस्कार मिळायला हवा', असा पाडगावकरांचा "बाईट' तुमच्याकडे नव्हता. त्या काकांनी आणखी एक गुगली टाकला. "बाईट' वगैरे शब्द आता लोकांना सरावाचे झालेत. पण तो कॅमेऱ्यासमोर असतो तोवरच ठीक असतं. बातमीदारांचं चुकलं असं वाटलं की लोक खऱ्या अर्थानं बाईट म्हणजे "चावा' घ्यायला लागतात. तर काका म्हणाले, मी ऐकलंय पाडगावकर काय म्हणाले ते. तुम्ही त्यांना विचारलंत, पद्म कुणाला मिळायला हवा? त्यावर पाडगावकर हसत हसत नेहमीच्या मिश्‍किल शैलीत म्हणाले, मंगेश पाडगावकर. याचा अर्थ पाडगावकरांनी पद्म पुरस्काराची मागणी केलेली नाही. पण तुम्ही बातमीदार, हवा तेवढा भाग "एडीट' करता आणि टीआरपीसाठी तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीला, तुम्हाला हव्या असलेल्याच वादाच्या विषयात ढकलता. वर, "अमुक अमुक यांचीच या वादात उडी' अशा बातम्या छापता. पाडगावकरांची याविषयातली मतं दाखवायची होती तर अनएडिटेड दाखवायला हवी होती किंवा छापायला हवी होती.

वादात उडी घेणारा माणूस कुणी प्रश्‍न विचारण्याची वाट बघत नाही. ते बोलून मोकळे होतात. राजकारणाच्या मंचावर हे खूपदाच घडतं. प्रश्‍न विचारले तर उत्तमच. नाहीतर त्यांनी आपणहून वादात उडी घेतलेलीच असते. पण तेंव्हाच ही बातमीदारी ठीक असते. मुळात अशा ठिकाणी रिपोर्टींग करण्याची वेळच येत नाही. तिथं बऱ्याचदा ड्राफ्टींगच करावं लागतं.

टीआरपीसाठी वाट्टेल त्या आणि वाट्टेल तशा बातम्या देण्यावर अजित पवारांनीही कालच टीका केलीय. त्याला संदर्भ आहे तो पवार-ठाकरे भेटीचा. नशीब त्या वादात "अजित पवारांची उडी' अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. कारण हा प्रश्‍नही पवारांना विचारला गेला होता. ते आपणहून बोलले नव्हतेच. पण वाचलो थोडक्‍यात. नाहीतर पुन्हा एकदा काकांचे प्रश्‍न आणि "मी निरुत्तर'.

Friday, January 22, 2010

ढिम्म युनिव्हर्सिटीज्‌ ... दशा आणि दिशा

विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्‍यात न येऊ देता अभिमत विद्यापीठ ही संकल्पनाच रद्द करणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. पण भवितव्य धोक्‍यात न येऊ देणं, म्हणजे नेमकं काय? याचा विचार आता व्यावहारीक पातळीवरही करण्याची गरज आहे. कारण अभिमत विद्यापीठांच्या मूळ संकल्पनेलाच अनेक संस्थाचालकांनी हरताळ फासल्याचं सांगितलं गेलं. पण खरा विषय तर पुढेच आहे. कारण रद्द केलेली विद्यापीठं आणि त्यातले विद्यार्थी सामावून कसे घेणार हा खरा प्रश्‍न आहे.

पहिल्या टप्प्यात ज्या 44 अभिमत विद्यापीठांची मान्यता रद्द करणार असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे, त्यात राज्यातली तीन आहेत. राज्यातल्या विद्यापीठांची संख्या आणि क्षमता लक्षात घेता, त्यातले हजारो विद्यार्थी संलग्न विद्यापीठाशी जोडले जातीलही. पण ते तर्कसंगत आणि व्यवहार्य असणार नाही. विद्यार्थ्यांना संलग्न विद्यापीठांशी जोडणं म्हणजे नेमकं काय?

अशा विद्यार्थ्यांनी आजपासून अभिमत विद्यापीठांऐवजी राज्य विद्यापीठांची परीक्षा द्यावी, असं म्हणणं जितकं हास्यास्पद तितकंच बंद केलेल्या विद्यापीठांना महाविद्यालयासारखं कामकाज करता येऊ शकतं, हे म्हणणं. हे हास्यास्पद अशासाठी, कारण, दोन्ही विद्यापीठांचे अभ्यासक्रम, शिकवण्याची पद्धत, परीक्षा पद्धत ही भिन्न आहे, असतेच. मग ते विद्यार्थी एका प्रकारच्या विद्यापीठात शिकून अचानक दुसऱ्या विद्यापीठाची परीक्षा कसे देणार? हा अन्याय विद्यार्थ्यांवर की शिक्षणव्यवस्थेवर? दोन्ही विद्यापीठांच्या परीक्षा वेगळ्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलं जाणारं प्रमाणपत्र याचा दर्जा काय मानावा, असा प्रश्‍न आहेच. शिवाय आधीच्या म्हणजे अभिमत विद्यापीठात एखादा विद्यार्थी एटीकेटी घेणारा असेल तर संलग्न विद्यापीठात प्रवेश देताना काय म्हणून देणार? आधीच्या विद्यापीठात एखाद्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल पण नव्या विद्यापीठाशी जोडलं जाताना तो पुन्हा तोच अभ्यास करणार का? किंवा आधीच्या विद्यापीठात असा अभ्यास झालाच नसेल तर नव्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात तो किती मागे पडेल?

काही अभिमत विद्यापीठात पीएच. डी. च्या स्वतंत्र पद्धती आहेत. त्या नव्या विद्यापीठाच्या नियमावलीशी सुसंगत नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? केवळ नव्या विद्यापीठाचे निकष वेगळे म्हणून त्यांना नव्यानं अभ्यास करायला सांगायचं की निकषच बदलायचे? दूरस्थ अभ्यासक्रमांचंही फारसं वेगळं नाही. म्हणजेच राज्य विद्यापीठांमध्ये नसलेले अभ्यासक्रम जर अभिमत विद्यापीठात शिकवले जात असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचं काय? त्यांना एखाद्या संलग्न विद्यापीठाशी जोडता येईल. पण हे संलग्न विद्यापीठ त्यांच्या सध्याच्या अभिमत विद्यापीठाच्या परिसरात असेलच असंही नाही. म्हणजेच विद्यापीठ बदलले की विद्यार्थ्यांची राहण्याची ठिकाणं बदलावी लागणार. साहजिकच एकीकडचे लोंढे दुसरीकडे. त्यामुळे निर्माण होणारे प्रश्‍न त्या त्या शहरांवर किंवा विद्यापीठांवर.

ज्या विद्यार्थ्यांनी अभिमत विद्यापीठांची फी भरलीय. त्यांना नव्या विद्यापीठात सामावून घेताना त्यांची फी कोण भरणार? अभिमत विद्यापीठांनी आकारलेली वेगवेगळी शुल्कं आणि खर्च, हे नव्या विद्यापीठाला कसं देणार? अशा विद्यार्थ्यांचा भार सरकार उचलणार का? हा प्रश्‍न आहेच. अभिमत विद्यापीठांकडे असलेलं मनुष्यबळ, इमारती आणि इतर पायाभूत सुविधा याचा वापर नंतर सरकार किंवा विद्यापीठ कसं करणार? याचा विचार आधीच करावा लागणाराय.

ज्या अभिमत विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम चालवले जातात, तिथल्या विद्यार्थ्यांना सामावून घेतील, अशी किती विद्यापीठं महाराष्ट्रात आहेत. वैद्यकीय असा विषय निघाला की नाशिकचं नाव येतं. पण उदाहरणादाखल असं घडेल असं मानलं तरी, पुण्यात शिकणारे विद्यार्थी नाशिकशी कशा पद्धतीनं जोडले जाणार? त्यावर वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल. मुळात असे विद्यार्थी सामावून घ्यायला आधीच्या विद्यापीठांची क्षमता आहे का आणि ती वाढवायला यंत्रणा आहे का? हे प्रश्‍न आहेतच. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचाही प्रश्‍न आहेच.

अभिमत विद्यापीठातले पात्रतेचे निकष, नोकऱ्यांच्या बढत्या, जागा, सर्व्हिस बुक, याचं नव्या विद्यापीठात स्थान काय? शिक्षक म्हणून त्यांची योग्यता, पात्रता असेलही. पण नव्या विद्यापीठात निकषच वेगळे असतील तर सेवासलगता, सेवाज्येष्ठता यावरून नव्या वादाला सुरवात होऊ शकते. मुळात असे शिक्षक सामावून घेण्यासाठी राज्य सरकारला आपल्या विद्यापीठांची क्षमता वाढवावी लागेल. हे सगळं सरकार करेल, असं अपेक्षित आहे. कारण सर्वोच्च न्यायालयापुढे प्रतिज्ञापत्र देताना संलग्न विद्यापीठात "त्या' विद्यार्थ्यांना सामावून घेतलं जाईल, असं सांगितल्यावर "सामावून घेणार म्हणजे नक्की काय करणार?' हा प्रश्‍न न्यायालय विचारणारच. त्याचं उत्तर सरकारला तयार ठेवावं लागेल.

अभिमत विद्यापीठांची मान्यता रद्द करण्याचा विचार सरकारनं थेट न्यायालयापुढे मांडलाय. पण विद्यार्थ्यांचं नुकसान करू देणार नाही, असं सांगून सरकारनं पहिल्या टप्प्यात तरी रोष कमी केलाय. पण हे असं अचानक का झालं? त्याचे विद्यार्थी पालकांच्या मनावर थेट परिणाम काय होणार? याचा विचार आधीच करावा लागेल. मान्यता रद्द करण्यापर्यंत अभिमत विद्यापीठांची स्थिती बिकट होती, तर आधीच पावलं का उचलली नाहीत, हा पहिलाच प्रश्‍न न्यायालय उपस्थित करू शकतं. आत्तापर्यंत झालेल्या दुर्लक्षामुळे ही वेळ आली का? या प्रश्‍नाला काय उत्तर असेल. बरं, सगळं ठीक चाललं होतं, तर मग एवढा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला? असं विचारलं जाईल. म्हणूनच म्हटलं की हा विषय वाटतो तितका सोपा नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं आणि सरकारच्या निर्णयाच्यादृष्टीनंही.

एकीकडं देशभरात उच्च शिक्षणासाठीचा टक्का वाढवण्यासाठी हजारो महाविद्यालयं आणि शेकडो विद्यापीठांची गरज असताना "अभिमत' विद्यापीठांवर कारवाई का? हा प्रश्‍न आहे. नाव बदलून का होईना, वेगळ्या संकल्पनेसह अशी विद्यापीठं किंवा शिक्षण संस्था सरकारला उभा कराव्याच लागतील. गरज आहे ती चांगले निकष आणि नियंत्रणाची, झाल्या चुका सुधारण्याची.

- स्वप्नील
दि. 22 जानेवारी 2010

Tuesday, January 19, 2010

रियॅलिटीशी स्पर्धा...

गेल्या काही दिवसातली सगळ्यात चर्चेत राहिलेली घटना म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या। त्या का होतायत? आणि थांबण्यासाठी काही करणार आहोत की नाही? असा एकमेकांना सवाल. स्पर्धा हे त्यामागचं एक ठळक कारण. मग ती रियॅलिटी शोमधली स्पर्धा असो किंवा आयुष्यातल्या रियॅलिटीशी. त्या स्पर्धेत तग धरून राहणारी पुढची पिढी तयार करण्यात आपण अपयशी ठरतो आहोत का? हा खरंतर या ब्लॉगचा आजचा विषय.

स्पर्धा प्रत्येक पिढीत असते. आत्महत्त्या पूर्वीही व्हायच्या आत्ताही होतायत. पण आज सहनशक्ती संपत चालल्यानं आत्महत्त्यांची संख्या आणि गांभीर्य वाढलंय हे नमूद करायलाच हवं. त्याला कारणीभूत आहे ती आजची परिस्थिती. अर्थात सगळं परिस्थितीवर ढकललं की आपण मोकळे होतो. थोडक्‍यात, "ही जबाबदारी सगळ्यांची असं म्हटलं की कुणाचीच नाही,' हे वेगळं सांगायला लागत नाही.

खरंच आत्महत्त्या कराविशी वाटणं? हे निव्वळ रियॅलिटी शो आणि शाळेतल्या गुणपत्रिकेवरची लाल रेष, याच्याशी जोडता येईल? अशा लाल रेषा असणारे सगळेच आत्महत्त्या करतात? आपण आत्महत्त्या करतो आहोत म्हणजे काय?, हे समजण्याइतकं त्या मुलामुलींचं वय होतं? याला केवळ टीव्ही-सिनेमा जबाबदार आहे, असं म्हणता येईल? हे प्रश्‍न स्वतःसाठी म्हणून मुद्दामच उपस्थित केलेत. यात सर्वस्वी दोष परिस्थितीचा नाही. आपण सगळेच दोषी. म्हणूनच आपापल्या वाटणीची जबाबदारी निश्‍चित करावी म्हणून हा लेखनप्रपंच.

रियॅलिटी शो मध्ये मुलं भाग घेतात. स्पर्धा होते. एसएमएस येतात. कुणी जिंकतं, कुणी हरतं. परीक्षक सांगतात "कुणीतरी जिंकणार, कुणीतरी हरणार'. पण हरणारा मीच का? हा प्रश्‍न निरुत्तर करणारा, स्वतःला. मी हरलो म्हणजे नेमकं काय झालं? हा प्रश्‍नही निरुत्तर करणारा, स्वतःला. ते समजण्याचं त्यांचं वयही नाही आणि गरजही नाही.

स्पर्धा ही स्पर्धेसाठी असते. जिंकण्यासाठी असते. पण जिंकणं म्हणजे काय? गिफ्ट व्हाऊचर्स? सिंगापूर ट्रीप? गाण्याचा अल्बम? लाखभर रुपये? एखाद्या सिनेमात नाचायची संधी? या सगळ्यापेक्षा जीव महत्वाचा नाही? पण हे सांगणार कोण? ही जबाबदारी पालकांची नाही? स्पर्धा ही जिंकण्यासाठीच असते, पण ती शिकण्यासाठीही असते हे कोण सांगणार? कुणीतरी जिंकतं-कुणीतरी हरतं, हे म्हणायला सोपं आहे, पण ते समजावून द्यायला नको? स्पर्धेत मुळात आपण कधीच हरत नसतो. लौकिकार्थानं तर नाहीच नाही. हे पालकांनीच सांगायला हवं. आपल्या मुलामुलींनी स्पर्धेत भाग घ्यावा पण तो निव्वळ जिंकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी, असं किती पालकांना वाटतं?

"कालच्या स्पर्धेपेक्षा आजच्या स्पर्धेत तुझ्या परफॉर्मन्समध्ये काय सुधारणा झाली?', असं किती पालक मुलामुलींना विचारतात. स्पर्धा ही कधीच इतरांशी असत नाही. ती असते स्वतःशी. आपल्याजवळ असलेल्या अस्त्रशस्त्रांनी आपण लढाई करावी. इतरांच्या भात्यात कुठला बाण आहे, आणि तो आपल्या भात्यात का नाही? हे काही निराश होण्याचं कारण नाही. माझ्या भात्यात असलेल्या बाणानं मी किती चांगली लढाई करू शकतो, हे महत्वाचं. पण एवढी सूट किती पालक देतात? तू तसाच गायला हवास किंवा तू तिच्यापेक्षा चांगली नाचायला हवीस, हा आग्रह पाल्यांना किती मारक ठरतो, याचा विचार होतो कुठे?

जिंकणं काय किंवा हरणं काय, हे शब्द त्या लहानग्या स्पर्धकांच्या मनात भरवतं कोण? इतक्‍या लहान वयात त्यांना या दोन्ही घटनांचा अर्थ तरी कळतो काय? बक्षीस हे निमित्त असतं ते अंगभूत कलेला प्रोत्साहन म्हणून. त्याचं महत्व तेवढंच. पण तेच बक्षीस निमित्त नव्हे तर सर्वस्व वाटायला लागलं की असे गोंधळ होतात.

आयुष्यात कितीतरी अशा स्पर्धा असतात. त्यामुळे एखाद्या स्पर्धेत यश मिळालं नाही, तर सर्वस्व संपलं, असं वाटायला कुणामुळे लागतं? तू जिंकलाच पाहिजेस, किंवा तू पहिलाच आला पाहिजेस हा अट्टहास कुणासाठी? कशासाठी? पालक, नातेवाईक, आजूबाजूची मंडळी या सगळ्यांच्या अपेक्षा वाढतात आणि त्याचं ओझं नकोसं झालं की आत्महत्त्या करावीशी वाटते, स्पर्धा हरल्यावर आणि परिक्षेत नापास झाल्यावर. शिक्षण क्षेत्रात तर तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे नापास होणं हे अजिबात परवडणारं नाही. शैक्षणिकदृष्ट्याही आणि आर्थिकदृष्ट्याही. अभ्यास करायलाच हवा, पण तो ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार. पण म्हणून आपल्या अपेक्षाचं ओझं पाल्यांवर का लादायचं? "मी शाळेत पहिला आलो नाही, पण तू यायला हवास'? हा अट्टहास कशासाठी? म्हणजे तुमची स्वप्नं पूर्ण करायला पुढची पिढी. मग आत्ताच्या पिढीचा कोंडमारा होतो. ती पिढी आधीच्या पिढीची स्वप्नं पूर्ण करायला धावत राहते. त्यांचं जगणंही राहून जातं आणि स्वप्नं पूर्ण करणंही. त्यांची राहून गेलेली स्वप्नं मग पुढच्या पिढीत. तिथून पुन्हा पुढच्या पिढीत. हे चक्र कुठल्या तरी पिढीत संपणार आहे की नाही? आपण ते संपवणार आहोत की नाही?

अजिबातच कुणाचं नियंत्रण नाही आणि मन मानेल तसं वाग, असं या सगळ्या लिखाणामागचा उद्देश नाही. पण पालक आणि पाल्यांचा सुसंवाद घडावा, अशा तळमळीनं हे सगळं लिहीलंय. वक्तृत्व किंवा वाद-विवाद स्पर्धांचा 350 हा विक्रमी आकडा ओलांडून मी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उभं राहणं थांबवलं तेंव्हा यातल्याच अनेक गोष्टींचा विचार केला होता. माझे पालक, शिक्षक आणि त्यावेळचे सहस्पर्धक, मित्र, यापैकी कुणीच, कधीच निव्वळ स्पर्धेसाठी नव्हते. हरणं-जिंकणं असतंच. पण ते लौकिकार्थानं नव्हे. स्पर्धा ही आपल्यासाठी असते. म्हणूनच आम्ही नुसत्या स्पर्धा केल्या नाहीत, तर स्पर्धा जगलो. म्हणूनच बक्षीस मिळाल्याचा उन्माद नाही आणि नारळ मिळाल्याचं दुःख नाही. प्रत्येक व्यासपीठावर जाताना आणि खाली उतरताना एकच प्रश्‍न या स्पर्धेनं मला काय शिकवलं?

- स्वप्नील19 जानेवारी 2010