Tuesday, January 19, 2010

रियॅलिटीशी स्पर्धा...

गेल्या काही दिवसातली सगळ्यात चर्चेत राहिलेली घटना म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या। त्या का होतायत? आणि थांबण्यासाठी काही करणार आहोत की नाही? असा एकमेकांना सवाल. स्पर्धा हे त्यामागचं एक ठळक कारण. मग ती रियॅलिटी शोमधली स्पर्धा असो किंवा आयुष्यातल्या रियॅलिटीशी. त्या स्पर्धेत तग धरून राहणारी पुढची पिढी तयार करण्यात आपण अपयशी ठरतो आहोत का? हा खरंतर या ब्लॉगचा आजचा विषय.

स्पर्धा प्रत्येक पिढीत असते. आत्महत्त्या पूर्वीही व्हायच्या आत्ताही होतायत. पण आज सहनशक्ती संपत चालल्यानं आत्महत्त्यांची संख्या आणि गांभीर्य वाढलंय हे नमूद करायलाच हवं. त्याला कारणीभूत आहे ती आजची परिस्थिती. अर्थात सगळं परिस्थितीवर ढकललं की आपण मोकळे होतो. थोडक्‍यात, "ही जबाबदारी सगळ्यांची असं म्हटलं की कुणाचीच नाही,' हे वेगळं सांगायला लागत नाही.

खरंच आत्महत्त्या कराविशी वाटणं? हे निव्वळ रियॅलिटी शो आणि शाळेतल्या गुणपत्रिकेवरची लाल रेष, याच्याशी जोडता येईल? अशा लाल रेषा असणारे सगळेच आत्महत्त्या करतात? आपण आत्महत्त्या करतो आहोत म्हणजे काय?, हे समजण्याइतकं त्या मुलामुलींचं वय होतं? याला केवळ टीव्ही-सिनेमा जबाबदार आहे, असं म्हणता येईल? हे प्रश्‍न स्वतःसाठी म्हणून मुद्दामच उपस्थित केलेत. यात सर्वस्वी दोष परिस्थितीचा नाही. आपण सगळेच दोषी. म्हणूनच आपापल्या वाटणीची जबाबदारी निश्‍चित करावी म्हणून हा लेखनप्रपंच.

रियॅलिटी शो मध्ये मुलं भाग घेतात. स्पर्धा होते. एसएमएस येतात. कुणी जिंकतं, कुणी हरतं. परीक्षक सांगतात "कुणीतरी जिंकणार, कुणीतरी हरणार'. पण हरणारा मीच का? हा प्रश्‍न निरुत्तर करणारा, स्वतःला. मी हरलो म्हणजे नेमकं काय झालं? हा प्रश्‍नही निरुत्तर करणारा, स्वतःला. ते समजण्याचं त्यांचं वयही नाही आणि गरजही नाही.

स्पर्धा ही स्पर्धेसाठी असते. जिंकण्यासाठी असते. पण जिंकणं म्हणजे काय? गिफ्ट व्हाऊचर्स? सिंगापूर ट्रीप? गाण्याचा अल्बम? लाखभर रुपये? एखाद्या सिनेमात नाचायची संधी? या सगळ्यापेक्षा जीव महत्वाचा नाही? पण हे सांगणार कोण? ही जबाबदारी पालकांची नाही? स्पर्धा ही जिंकण्यासाठीच असते, पण ती शिकण्यासाठीही असते हे कोण सांगणार? कुणीतरी जिंकतं-कुणीतरी हरतं, हे म्हणायला सोपं आहे, पण ते समजावून द्यायला नको? स्पर्धेत मुळात आपण कधीच हरत नसतो. लौकिकार्थानं तर नाहीच नाही. हे पालकांनीच सांगायला हवं. आपल्या मुलामुलींनी स्पर्धेत भाग घ्यावा पण तो निव्वळ जिंकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी, असं किती पालकांना वाटतं?

"कालच्या स्पर्धेपेक्षा आजच्या स्पर्धेत तुझ्या परफॉर्मन्समध्ये काय सुधारणा झाली?', असं किती पालक मुलामुलींना विचारतात. स्पर्धा ही कधीच इतरांशी असत नाही. ती असते स्वतःशी. आपल्याजवळ असलेल्या अस्त्रशस्त्रांनी आपण लढाई करावी. इतरांच्या भात्यात कुठला बाण आहे, आणि तो आपल्या भात्यात का नाही? हे काही निराश होण्याचं कारण नाही. माझ्या भात्यात असलेल्या बाणानं मी किती चांगली लढाई करू शकतो, हे महत्वाचं. पण एवढी सूट किती पालक देतात? तू तसाच गायला हवास किंवा तू तिच्यापेक्षा चांगली नाचायला हवीस, हा आग्रह पाल्यांना किती मारक ठरतो, याचा विचार होतो कुठे?

जिंकणं काय किंवा हरणं काय, हे शब्द त्या लहानग्या स्पर्धकांच्या मनात भरवतं कोण? इतक्‍या लहान वयात त्यांना या दोन्ही घटनांचा अर्थ तरी कळतो काय? बक्षीस हे निमित्त असतं ते अंगभूत कलेला प्रोत्साहन म्हणून. त्याचं महत्व तेवढंच. पण तेच बक्षीस निमित्त नव्हे तर सर्वस्व वाटायला लागलं की असे गोंधळ होतात.

आयुष्यात कितीतरी अशा स्पर्धा असतात. त्यामुळे एखाद्या स्पर्धेत यश मिळालं नाही, तर सर्वस्व संपलं, असं वाटायला कुणामुळे लागतं? तू जिंकलाच पाहिजेस, किंवा तू पहिलाच आला पाहिजेस हा अट्टहास कुणासाठी? कशासाठी? पालक, नातेवाईक, आजूबाजूची मंडळी या सगळ्यांच्या अपेक्षा वाढतात आणि त्याचं ओझं नकोसं झालं की आत्महत्त्या करावीशी वाटते, स्पर्धा हरल्यावर आणि परिक्षेत नापास झाल्यावर. शिक्षण क्षेत्रात तर तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे नापास होणं हे अजिबात परवडणारं नाही. शैक्षणिकदृष्ट्याही आणि आर्थिकदृष्ट्याही. अभ्यास करायलाच हवा, पण तो ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार. पण म्हणून आपल्या अपेक्षाचं ओझं पाल्यांवर का लादायचं? "मी शाळेत पहिला आलो नाही, पण तू यायला हवास'? हा अट्टहास कशासाठी? म्हणजे तुमची स्वप्नं पूर्ण करायला पुढची पिढी. मग आत्ताच्या पिढीचा कोंडमारा होतो. ती पिढी आधीच्या पिढीची स्वप्नं पूर्ण करायला धावत राहते. त्यांचं जगणंही राहून जातं आणि स्वप्नं पूर्ण करणंही. त्यांची राहून गेलेली स्वप्नं मग पुढच्या पिढीत. तिथून पुन्हा पुढच्या पिढीत. हे चक्र कुठल्या तरी पिढीत संपणार आहे की नाही? आपण ते संपवणार आहोत की नाही?

अजिबातच कुणाचं नियंत्रण नाही आणि मन मानेल तसं वाग, असं या सगळ्या लिखाणामागचा उद्देश नाही. पण पालक आणि पाल्यांचा सुसंवाद घडावा, अशा तळमळीनं हे सगळं लिहीलंय. वक्तृत्व किंवा वाद-विवाद स्पर्धांचा 350 हा विक्रमी आकडा ओलांडून मी स्पर्धेसाठी व्यासपीठावर उभं राहणं थांबवलं तेंव्हा यातल्याच अनेक गोष्टींचा विचार केला होता. माझे पालक, शिक्षक आणि त्यावेळचे सहस्पर्धक, मित्र, यापैकी कुणीच, कधीच निव्वळ स्पर्धेसाठी नव्हते. हरणं-जिंकणं असतंच. पण ते लौकिकार्थानं नव्हे. स्पर्धा ही आपल्यासाठी असते. म्हणूनच आम्ही नुसत्या स्पर्धा केल्या नाहीत, तर स्पर्धा जगलो. म्हणूनच बक्षीस मिळाल्याचा उन्माद नाही आणि नारळ मिळाल्याचं दुःख नाही. प्रत्येक व्यासपीठावर जाताना आणि खाली उतरताना एकच प्रश्‍न या स्पर्धेनं मला काय शिकवलं?

- स्वप्नील19 जानेवारी 2010

No comments:

Post a Comment