मी निरुत्तर....
लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती. एक छोटी मुलगी विहीरीत पडते. तिला वाचवायला एकजण उडी मारतो. तिला वाचवतो. बाहेर आल्यावर लोक त्याचं कौतुक करतात. पण तो विचारतो, कौतुक वगैरे ठीक आहे, पण मला ढकललं कुणी?
बातमीदारी करताना बऱ्याचदा अशा प्रसंगांना आणि प्रश्नांना सामोरं जावं लागतं. लक्षात येतं की सगळंच काही वाईट नसतं. आपणच फक्त बरोबर असतो असं नाही. बातमीदारीत प्रत्येक शब्दाला महत्व असतं. पण तेच शब्द चुकीच्या ठिकाणी वापरले किंवा गरज नसताना वापरले तर गोंधळ उडतात.
"पद्म पुरस्कारावरनं सुरू झालेल्या वादात पाडगावकर यांची उडी' अशा आशयाच्या बातम्या वाचल्या आणि ही गोष्ट आठवली. पद्म पुरस्कार जाहीर झाले. ते कुणाला मिळाले? कसे मिळाले? हा वादाचा विषय झाला. पण या विषयाशी दूरान्वयेही संबंध नसलेल्या काहींना हे प्रश्न कॅमेऱ्यासमोर विचारले जातात. उत्तर दिलं नाही तर "या विषयावर बोलायला नकार' आणि उत्तर दिलंच तर "अमुक अमुक वादात यांचीही उडी' अशा मथळ्याच्या बातम्या. अरे त्यांनी उडी घेतलेली नाही. तर त्यांना त्या वादात ओढलं गेलंय, हे लक्षात घेतलं जात नाही.
बरं राजकारणात तर अनेकजण असे असतात जे केंद्रीय अर्थसंकल्पापास्नं गावातल्या गटारीपर्यंत कुठल्याही विषयावर अधिकारवाणीनं बोलतात. त्या मंडळींना तर अशा वादात ढकलावंच लागत नाही. ते आपणहून उडी घेतात. पण सगळेच तसे नसतात. काहीवेळा बातमीदारी करताना, प्रतिक्रिया घेण्यासाठी व्यक्तींची निवड करतानाच गल्लत होते, अशी जी टीका होते, त्याचं हे उत्तम उदाहरण. एखाद्या विषयावरचा तज्ज्ञ कोण? हे समजून त्यालाच त्या विषयावर प्रश्न विचारला गेला पाहिजे. पण टीआरपीसाठी वाट्टेल ते होतं, असं लोकं म्हणतात ते काही खोटं नाही.
पाडगावकरांना हा प्रश्न विचारलाच का? असा प्रश्न मला एका काकांनी विचारला. "मी निरुत्तर'. कदाचित माझा बातमीदारीतला अनुभव कमी असेल, पण त्या काकांना देण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं नाही. पद्म पुरस्कार कुणाला मिळावा? आणि कुणाला मिळाला नाही?, हा प्रश्न पाडगावकरांना का विचारावा? ते निवड समितीवर आहेत? की स्पर्धेत होते आणि त्यांची निवड झालेली नाही? की आणखी काही? जर या प्रश्नांची उत्तरं नसतील तर उगाचच त्यांच्यापुढे कॅमेरा किंवा वहीपेन घेण्यात काय अर्थ?
बरं, "मला पद्म पुरस्कार मिळायला हवा', असा पाडगावकरांचा "बाईट' तुमच्याकडे नव्हता. त्या काकांनी आणखी एक गुगली टाकला. "बाईट' वगैरे शब्द आता लोकांना सरावाचे झालेत. पण तो कॅमेऱ्यासमोर असतो तोवरच ठीक असतं. बातमीदारांचं चुकलं असं वाटलं की लोक खऱ्या अर्थानं बाईट म्हणजे "चावा' घ्यायला लागतात. तर काका म्हणाले, मी ऐकलंय पाडगावकर काय म्हणाले ते. तुम्ही त्यांना विचारलंत, पद्म कुणाला मिळायला हवा? त्यावर पाडगावकर हसत हसत नेहमीच्या मिश्किल शैलीत म्हणाले, मंगेश पाडगावकर. याचा अर्थ पाडगावकरांनी पद्म पुरस्काराची मागणी केलेली नाही. पण तुम्ही बातमीदार, हवा तेवढा भाग "एडीट' करता आणि टीआरपीसाठी तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीला, तुम्हाला हव्या असलेल्याच वादाच्या विषयात ढकलता. वर, "अमुक अमुक यांचीच या वादात उडी' अशा बातम्या छापता. पाडगावकरांची याविषयातली मतं दाखवायची होती तर अनएडिटेड दाखवायला हवी होती किंवा छापायला हवी होती.
वादात उडी घेणारा माणूस कुणी प्रश्न विचारण्याची वाट बघत नाही. ते बोलून मोकळे होतात. राजकारणाच्या मंचावर हे खूपदाच घडतं. प्रश्न विचारले तर उत्तमच. नाहीतर त्यांनी आपणहून वादात उडी घेतलेलीच असते. पण तेंव्हाच ही बातमीदारी ठीक असते. मुळात अशा ठिकाणी रिपोर्टींग करण्याची वेळच येत नाही. तिथं बऱ्याचदा ड्राफ्टींगच करावं लागतं.
टीआरपीसाठी वाट्टेल त्या आणि वाट्टेल तशा बातम्या देण्यावर अजित पवारांनीही कालच टीका केलीय. त्याला संदर्भ आहे तो पवार-ठाकरे भेटीचा. नशीब त्या वादात "अजित पवारांची उडी' अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या नाहीत. कारण हा प्रश्नही पवारांना विचारला गेला होता. ते आपणहून बोलले नव्हतेच. पण वाचलो थोडक्यात. नाहीतर पुन्हा एकदा काकांचे प्रश्न आणि "मी निरुत्तर'.
Tuesday, February 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment